Wednesday 15 June 2011

*** भिजायचे हळूहळू...

***
पुन्हा लहान होउनी,झुलायचे हळूहळू

उनाडक्या करूनही रुसायचे हळूहळू

लबाड नेत्र पाझरो ,खरा झरा तुझा असे
तुझ्याच पावसामधे भिजायचे हळूहळू...

समोर वाट
आंधळी, भरून दे प्रकाश तू
तुझ्याशिवाय चालणे जमायचे हळूहळू

तुझा सुवास घ्यायचा,तुलाच हात द्यायचा
लुटून गंध आतला ,रमायचे हळूहळू...

अथांग सागरामधे दिसेल मी तुला कसा !
तुझ्या विशाल लोचनी बुडायचे हळूहळू...

मिळेल दाट सावली,लपेन कुंतलात मी
तुझ्या मनास बावरे करायचे हळूहळू ...

हुशार बेरकी
तुझा स्वभाव बोलघेवडा
मनातले अजूनही कळायचे हळूहळू ....



---- अरविंद

वृत्त---कलिंदनंदिनी 

No comments:

Post a Comment