Tuesday 31 May 2011

*** प्रेम लावावे कशाला ?

***
प्रेम लावावे  कशाला ?
बांध फोडावे कशाला ?

जीवना आनंद द्यावा ,
दुःख लादावे कशाला ? 

हुंदके मी दाबतांना ,
ओठ उघडावे कशाला ?

क्षालनास्तव पातकांच्या,
पुण्य संपावे कशाला ?

शब्द येता भोवताली 
सूर सोडावे कशाला ?

सावली नाही सुखाची,
सभ्य कांगावे कशाला ?

'संपदा' बोलून घे तू,
मौन पाळावे कशाला ?

----- संपदा   

Sunday 29 May 2011

*** सांगेन मी केव्हांतरी

***
वारा कळ्यांशी बोलला,कानातल्या कानी जरी
हितगूज त्यांचे ऐकले,सांगेन मी केव्हांतरी

हासून सुमने डोलली ,एकेक कलिका लाजरी
रंगून तेव्हा रंगली, बागेत गाणी साजरी ..

गाशील जेव्हा गीत तू, स्मरशील प्रीती साजणा
घोटाळतो अद्यापही तो गंध ताजा साजणा

डोळे फुलांचे लाजरे,मी झाकले होते तरी
त्याना सुगावा लागला,ते बोलले काहीतरी

*** लोचनांनो

***
वृत्त----- व्योमगंगा


***

लोचनांनो आसवांना ,एवढे ढाळू नका रे ,
थेंब मोठे मोतियांचे,आज ओसंडू नका रे ...
*
भावनांनी भोवताली घातला होता गराडा,
काळजाला लागलेला घाव ओलावू नका रे...
*
भान ठेवा ,आसवे ही अंतरीची ठेव आहे,
माझिया संवेदनेच्या, या खुणा गाडू नका रे....
*
खूप आले, खूप गेले, आसवे स्नेहीच माझे,
एकटा राहू कसा मी ?आटुनी जाऊ नका रे...
*
दुःख होवो मोद अथवा, एक अश्रू सोबतीला,
खाण माझी अंतरीची, एवढी उधळू नका रे....


*

*** सावर जरा....

वृत्त----गांधर्वी

मात्रा---[ १४ ]



***

धुंद झाले, सावर जरा....
खूप दमले,थोपव जरा....
*
तृप्त झाले मन ऐकुनी,
'देस रागा ' थांबव जरा....
*
ओठ माझे अधीर सख्या,
बासुरी तू आवर जरा....
*
साथ आहे आता जरी ,
अंतरी तू साठव जरा....
*
श्वास घेता तूच ओठी ,
तू मलाही आठव जरा....
*
झोप नाही चैन नाही,
घाल जीवा पाखर जरा....
*
काम आदी दोष माझे,
नंदलाला , आवर जरा....
*
शीर माझे पद्मचरणी ,
बावरीला सावर जरा....

*** तारतो सावळा....

वृत्त---- स्त्रग्विणी

गालगा .गालगा. गालगा. गालगा


***

बोलणे आपले ऐकतो सावळा,
चालतो का तसे, पाहतो सावळा.....
*
साथ नाही दिली आपुल्यांनी जरी,
सोबतीने बघा , चालतो सावळा....
*
बोलणारे अती, थांबणारे कमी
तो तरी पाहुनी, थांबतो सावळा....
*
फुंकता बासरी, सूर ओठातुनी
टाकुनी मोहिनी, जिंकतो सावळा....
*
दुःख होता अम्हा, जाणतो हा कसा ?
भार सारा सदा, वाहतो सावळा....
*
ध्यास ठेवू मनी, भाव त्याच्यावरी
नाम घेता मुखें, तारतो सावळा....

*** मोहिनी

वृत्त----- मोहिनी

मात्रा---- [१४, १०] =२४


***

भाव माझ्या अंतरीचा ,ओळखून जा रे

पूर वेडया आसवांचा, थोपवून जा रे ....

*
झोप तू चोरलीस तरी, लागलेच डोळे

तोडत साखळी स्वप्नांची , जागवून जा रे....

*
दुर्मिळ किती भेट तुझी नि बोल लाघवी रे ,

गोड गोड शब्दांनी मला मोहरून जा रे....

*
क्षण तुझ्या सान्निध्यातले, साठवून घ्यावे

सोबतीच्या या क्षणांना ,मन्तरून जा रे....

*
लाखो आहेत की रत्ने, वाण काय त्यांची ?

अंतरीचा माणिक जरा , पारखून जा रे....

*
टाकतोस खुशाल सखया मोहिनी किती रे !

मायाजालातून मला , सोडवून जा रे ....

*** मी तुझ्या काबूत आहे !


***
वृत्त ---- गांधर्वी

मात्रा--- [ १४ ]


***

मी इथे शाबूत आहे ,
की, तुझ्या काबूत आहे !
*
ध्यास लागावा मनाला,
हे तुझ्या जादूत आहे...
*
लाजतांना हासणे हा ,
कोणता आकूत आहे ?
*
माळलेल्या मोग-याचा ,
वास माझा दूत आहे...
*
स्वप्न जाणू की खरे हे ?
मी तुझा आहूत आहे...
*
आसवे ही आनंदाची,
दाटलेला कूत आहे...
*
एकटा मी वेदनांना,
आसवांनी धूत आहे...




आकूत----हेतु
आहूत----आमंत्रित
कूत-----आवेग 

*** तुझ्या नामासाठी...

वृत्त---- कल्याण

मात्रा-- ( ८,८,८ )= २४


***

सरसावो हे हात गरजूंच्या कामासाठी,
धन, श्रम, माझे कामा येवो इतरांसाठी...
*
रसना गाओ स्तुति आणिक गोडच वाणी,
शब्द शर हे,वापरू फक्त सुखविण्यासाठी...
*
श्वासगणिक रे येवो रामा, तुझी आठवण,
श्वास दिलेले अर्पण तुझिया गानासाठी...
*
रोमरोमात असाच येवो, ध्वनि राम राम,
अंतरातील स्पंदने तुझ्या नामासाठी...
*
सुख विनाशी कायिक भौतिक, अल्प काळाचे,
आत्मानंद अविनाशी ,जगू तयासाठी...

*** कन्येस

वृत्त---- लज्जिता
-------गालगा गालगा लगागागा

***

अंबरी तारका, तुझ्यासाठी
जीव होतो खुळा ,तुझ्यासाठी...
*
रात्र होता अशी दशा होते,
जाळती वेदना,तुझ्यासाठी...
*
देव जाणे कशी परी माझी !
दाटती भावना,तुझ्यासाठी...
*
आठवांचा लळा, मनी वाहे
अंतरी गारवा, तुझ्यासाठी...
*
एकटी अंगणी ,इथे गाते,
सावळी कोकिळा, तुझ्यासाठी...
*
थोपवा आसवे,कुणा सांगू ?
वाहतो पूर हा, तुझ्यासाठी...

*** सोबती..

वृत्त:- मेनका
**

कोण जो नाही , सुखाचा सोबती ?
दुःख आहे आयुष्याचा सोबती....

गुंग सारे आपल्या सौख्यात हो,
हृदयी आनंद माझा सोबती...

कोणताही सूर नाही लागला,
राग त्याच्या बासुरीचा सोबती...

दुःख एकाकीपणाचे साहले,
आसवांचा थेंब होता सोबती...

नाव माझी लाव तीरा ,नाविका
रे नियंता, तूच माझा सोबती...

दूर सारे, राहिलो मी एकटा,
राम देही, 'राम' माझा सोबती... 

*** तुजविना

पृथ्वी या अक्षरगणवृत्तात गझल ...

०-०-०

कुठे भटकशी मना, सुख पहा फुलू लागले
कशात रमलास तू? गगन हे खुलू लागले..

सुरेख नटली धरा, पवन ही कसा बागडे
निर्झर बघ हे कसे, खळखळा डुलू लागले...

पर्णी सळसळी जसे, कर धरुन नाचायला
फुलां सुरसुरी असे,कर करी झुलू लागले..

पहा!तुजशिवाय ही, सुकत चालली वल्लरी
फुले सुकून गेली गे,अलक ही गळू लागले..

असा सुखद गारवा, तुजविना असे एकला
तुझे नसणे या क्षणी,सल मनी सलू लागले..

*** रुसलास कां?..

***
सदर कविता "हरिणी" या अक्षरगणवृत्तात आहे.या वृत्तात १७ अक्षरे असून यती ६ व १० व्या अक्षरावर असते.
गण--- न-स-म-र-स-लग

***

परतुनि बघे जाता जाता,पुन्हा वळलास कां?
हुरहुर मनी तुझ्या वाटे,तरी रुसलास कां?..

तुजविण कशी राहू आता,स्वप्नी दिसलास तू
चटकन उशी ओली झाली,मनी बसलास कां?

कण कण असा झाला ओला,शुष्क क्षण वाटला
हिरवळ तुझी कुठे गेली,असा सुकलास कां?

सळसळ बरी केली होती अरे हृदयात तू
खळखळ झरा पाणावूनी, मनी उरलास कां?

मजजवळ ना माझे कांही, तुझी संपदा असे
नयन नयनी झाले सारे, असा बुडलास कां?..

*** कृष्णा

***
सदर कविता "वसंततिलका" या अक्षरगणवृत्तात आहे. या वृत्तात त,भ,ज,ज,ग,ग हे गण येतात. यती आठव्या अक्षरावर असते.

--

माझे उजाड मन तू,फुलवून जावे
माझ्या मनास हसणे,शिकवून जावे..

डोळ्यात मीच तुझिया,मज न्याहळावे
एका सुरात मजला,बसवून जावे..

माझ्या समीप बसुनी,मन रमवावे
गोविंदमाधव मला ,खुलवून जावे..

डोळ्यात वाच सखया, श्ब्दभाव माझे
भावात आज मन्मना,रमवून जावे..

ओठातुनी सुरमयी,गीत आळवावे
गीतात रंग भरुनी,भिजवून जावे...

*** आज जावू नको

.प्रस्तुत कविता "मालिनी" या अक्षरगणवृत्तात लिहिलेली आहे.मालिनी वृत्तात न-न-म-य-य हे गण असतात, यती ८ व्या अक्षरावर असते..

--

मन समरस झाले, आजमावू नको रे
परिमळ उधळूनी ,आज जावू नको रे...

झुळ्झुळ जल वाहे,गान गातो झरा हा
नकळत विरहाचा राग गाऊ नको रे...

सतत फुलव ध्वनी, सूर कानी घुमू दे
पद थिरकति माझे, वेणु ठेवू नको रे

तव अधरसुधा ही, तृप्त होऊन जावे
पुनरपि मिलनाची, आस लावू नको रे...


पदअरविंदतुझे,त्यावरी शीर राहो.
नित संगत असू दे, आज जावू नको रे...

*** आज जोडून जा तू...

***
..प्रस्तुत कविता "मालिनी" या अक्षरगणवृत्तात लिहिलेली आहे.मालिनी वृत्तात न-न-म-य-य हे गण असतात, यती ८ व्या अक्षरावर असते..

*****

विचलित मन माझे,तार जोडून जा तू
धुन्द मधुर सुरांचा साज छेडून जा तू...

क्षणभर रमलेला डाव हा सोबतीचा
विसरुन मज आता, डाव सोडून जा तू ...

फुलत डुलत होती बाग मोहोरलेली
परिमळ उधळूनी ,गंध सोडून जा तू॥

सुखकर तव स्मृती कोरलेल्या किती या
हसत रुसत त्याना ,आज गाडून जा तू...

सजल नयन दोघे एक होऊन गेले
नकळत जुळलेले ,पाश तोडून जा तू...

क्षण क्षण जपलेले दूर होऊ पहाती
पळभर तुझियाशी, आज जोडून जा तू...

*** नाचती लोक सारे...

***
वृत्त---मालिनी
गण--- न न म य य

**

नकळत सुख येता, डोलती लोक सारे
कण कण भिजवाया, पाहती लोक सारे...
*
सत रज तम सारे, राहती अंतरी या
सबळ गुण जसा तै, भोगती लोक सारे...
*
परमसुख मिळेना, शोध घेती जयाचा
मग क्षणिक सुखाने, नाचती लोक सारे...
*
पळभर जगतांना, सर्व आयुष्य जाते
उधळत क्षण वाया, घालती लोक सारे...
*
तुजविण बघ रामा, कोण आहे दुजा रे !
मन तव भजनी ना, लावती लोक सारे...
*
क्षणभर दिसता तू, शब्द निःशब्द होतो
परि तुजच असे कां , विसरती लोक सारे...

*** आम्हा कळू लागले...

*
प्रस्तुत कविता "शार्दूलविक्रीडित" या अक्षरगणवृत्तात असून यात म-स-ज-स-त-त-ग हे गण येतात। यती १२ व्या अक्षरावर असते...


*
कोणीही नसते कठीण समयी,आम्हा कळू लागले-
एकाकी कुढणे असेच जगणे ,आता रुळू लागले...

*
सांगाती मिळती सुखात सगळे, प्राप्तीस्तव मुंगळे
चिंतेत दिसलो तरी सवंगडी, आता पळू लागले...

*
छाया देती परोपकार करती, सांभाळती बापुडे
वृक्षांचे उपकार जाण मनुष्या,ते का गळू लागले...

*
द्यावे हो सर्वदा असेच सुमुखें,हातास येईल ते-
देते ही धरणी कितीक सहते,आम्हा कळू लागले...

*
देऊ या सुख आणि आनंद फक्त, आहे तरी काय हो !
होऊनी हर्षदा मिळेल संपदा, आता कळू लागले...

*** सोबती..

वृत्त:- मेनका
**

कोण जो नाही , सुखाचा सोबती ?
दुःख आहे आयुष्याचा सोबती.... []

गुंग सारे आपल्या सौख्यात हो,
हृदयी आनंद माझा सोबती... []

कोणताही सूर नाही लागला,
राग त्याच्या बासुरीचा सोबती... []

दुःख एकाकीपणाचे साहले,
आसवांचा थेंब होता सोबती... []

नाव माझी लाव तीरा ,नाविका
रे नियंता, तूच माझा सोबती... []

दूर सारे, राहिलो मी एकटा,
राम देही, 'राम' माझा सोबती... []

*** राधा

वृत्त - राधा
गण - गालगागा गालगागा गालगागागा
मात्रा - २३


***

एकटी मी कंठ माझा दाटला होता,
सोबतीला तू हवासा वाटला होता...

ठाव माझ्या काळजाचा घेतला तेव्हा,
काल रात्री स्वर माझा फाटला होता...

वेदनेचा जाळ काही शांत होईना,
अंतरीचा हा झराही आटला होता...

मीच माझ्या सोबतीला, एकटी होते.
सूर काना बासुरीचा वाटला होता...

बैस रे तू 'राम'कृष्णा, माझियापाशी.
अंतरी हा भाव माझ्या दाटला होता...

*** जाणण्याची वाट आहे...

***
साचलेल्या मान्यतांना ,सारण्याची वाट आहे
कोण मी?कोठून आलो?जाणण्याची वाट आहे...
*
धावता मागे सुखाच्या, दुःख येई सोबतीने
नीर अथवा क्षीर घ्यावे? जाणण्याची वाट आहे...
*
अंतरी ब्रह्माण्ड आहे, गावले नाही कधी ते
आपला देही तिथे हा , शोधण्याची वाट आहे...
*
पाहती सा-या जगाला, पाहिले नाही तयाला
आपल्या कोषातला 'मी',पाहण्याची वाट आहे...
*
जीवनाचा घाट बाका, अंतरी अमृत साठा
ख़ास अमृतास आता, चाखण्याची वाट आहे....

*** अनमोल आहे...

वृत्त--- मनोरमा
गालगागा गालगागा
***
घाव माझा खोल आहे,
की, मनाचा ढोल आहे ?

पापण्यांच्या आत माझ्या,
काळजाची ओल आहे...

मौन माझे हेच आता,
अंतरीचा बोल आहे...

झिंगलो नाही कधीही,
राखला मी तोल आहे....

कोरडा भासे तरीही,
अंतरी या ओल आहे...

प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे
भावना अनमोल आहे...

*** जागवू मी कशी ?

***
शब्द ही झोपले,जागवू मी कशी?
आठवांना तुझ्या,झोपवू मी कशी?

भावना जागती, सारख्या अंतरी
आसवांना तरी,थोपवू मी कशी ?

शब्द झाले मुके, सूर ही पोरके
गीत ओठातुनी, आळवू मी कशी ?

सारले मी तुला,दूर केले कधी
मेळ आता बरे, घालवू मी कशी ?

नीर क्षीरात किती, क्षीर नीरात किती?
सांग कोड़े अता सोडवू मी कशी ?

आठवेना मला, गुंतले मी किती ?
पाय गुंत्यातुनी ,सोडवू मी कशी?

*** वाट आहे.....

***

वृत्त----- मंजुघोषा
गण---- गालगागा गालगागा गालगागा


****

बोल तैसे , वागण्याची वाट आहे.....
जाणती सारे, कृतीची वाट आहे.....

जीव येतो कोठुनी, कोणास ठावे !
सांग देवा, कोणती ही वाट आहे.....

काय केले काल ? ते ही आठवेना.
कोण मी ? हे जाणण्याची वाट आहे.....

ऐक जीवा, जाण आत्मा देव हा तू..
जायची ईशाकडे, ही वाट आहे.....

कुंभ प्रेमामृते, काठोकाठ आहे.
चाखयाला भेटण्याची वाट आहे.....

' राम ' त्याच्या जीवनी, जो देत राही,
आयते खाती, तयांची वाट आहे..... 

*** ध्यास आता...

***
वृत्त-----प्रमिला-मृगाक्षी

लगागागा लगागागा लगागा


***

तुझ्या श्वासात आहे, श्वास आता,
तुझा एकांत लाभो, ध्यास आता...
*
तुझ्या नामात मी रंगून जाता,
असा कांही पळाला त्रास आता...
*
तुला ठाऊक सारे, जाणतो तू,
जिवाला लागला रे , ध्यास आता...
*
कुणी नाही कुणाचा आज येथे,
नष्ट झाला मनाचा भास आता...
*
दिल्या सोडून मी माझ्या अपेक्षा,
इथे आहेस माझा तू ख़ास आता...
*
पदा तुझ्या रहावे शीर माझे,
तुझा राहो इथेच वास आता...

*** ध्यास सावळ्याचा


***
सावळ्याचा मना ध्यास होता,
दूर जातोच तो,आस होता...

संचिताचे जरी भोग सारे,
साद देईल तो, दास होता....

बासुरीने मना धुंद केले
सूर ओठातला, ख़ास होता....

शोधले मी तरी सापडेना,
तोच श्वासातला ,श्वास होता...


जिद्द झाली पुरी भेटण्याची
सावळ्याचा मनी वास होता...


....

वृत्त---भामिनी

गालगा गालगा गालगागा. 

*** मीच सामावून गेलो...

***
मी तुझ्या मौनात माझी उत्तरे शोधून गेलो
बोलले डोळे तुझे अन् सार मी जाणून गेलो...

बावळ्या प्रश्नांस होती ,गोड ओठांची अपेक्षा
मी तुझ्या डोळ्यांत सारी अक्षरे वाचून गेलो

माझियासाठी पुरेशी आठवांची ही शिदोरी
हुंदके घेऊन आलो , हृदय मी ठेवून गेलो...

कंठ होता दाटलेला,शब्द काहीही फुटेना
वाटला माझा अचंबा, मी कसा गाऊन गेलो !

हक्क घेण्याचा तुला अन् फक्त देणे काम माझे
मी तुझ्यावाचून नाही, हा तुझा होऊन गेलो...

मोहिनी तव लोचनांची काय सांगावी तुला मी ?
पापण्यांच्या आत तुझिया,मीच सामावून गेलो...

*** सूर आता फसू लागले...


***
दुःख जेव्हां वसू लागले,
सोबतीही नसू लागले....

पाहुनी आमची ही दशा,
लोक सारे हसू लागले...

पूर आला असा लोचनी,
बांध सारे धसू लागले....

वादळे माजली अंतरी,
हेलकावे बसू लागले...

गीत माझे किती लाघवी !
सूर आता फसू लागले...

त्या सुखाचे अता भासही,
काळजाला डसू लागले...

झोपली बेरकी उत्तरे,
प्रश्न जागे असू लागले...

साथ देई सदा सावळा,
रूप त्याचे ठसू लागले...


....

वृत्त.---वीरलक्ष्मी

गालगा गालगा गालगा

*** भाळले दुःख माझ्यावरी

***

भाळले दुःख माझ्यावरी,पाहुण्यासारखे वावरू लागले
खूप होती सुखे वर्षली,पूर मोठे अता ओसरू लागले....

दुःख जेव्हां घरी नांदते,आपल्याशी बरे कोण हो बोलते ?
बोललो माझियाशी अता ,अंतरी या झरे पाझरू लागले...

लोपला सूर कोठे अता.,लागला एकदा ना मनासारखा
ना करी धुंद वारा मना,वृक्ष बागेत ना मोहरू लागले....

तोल माझा ढळे ना कधी ,देखणा हात हाती सुखाचा असे...
दुःख माझे सदा सोबती, तेच आता मला सावरू लागले....

काय आशा धरावी मनी, कोण आहे कुणाचा इथे ?
आज हे हुंदके माझिया,आसवांना अता आवरू लागले....

*** जवळी असता

***
जवळी असता मन मोहरते,
नसता दिसता मग बावरते...

झुलतात मनी तव आठवणी,
उकळी फुटते,परि गांगरते...

रज ही उडते,जमता जमते,
झुरता झुरता मन पाझरते...

अवती भवती तर भास तुझा,
नयना पुसुनी मज सावरते...

क्षण एक तरी सहवास हवा,
बसशील जरा मन आवरते...

बस आज तरी अवघा दिस तू,
दररोज तशी जगते मरते....

*** रोज या नावापुढे

***
रोज या नावापुढे ताजेतवाने पाप आहे
तीच ती आहे निराशा, तोच पश्चात्ताप आहे


कोठला मुक्काम ऐसा ,आणला गेलो इथे मी
पावली प्रत्येक कां ,लाचार आपोआप आहे ?


लाख होते कष्ट केले ,चांगले केले जरी मी
माझिया पाठीवरी कां ,ना कुणाची थाप आहे ?...


बोलवा लाखो सुखाला,दुःख आपोआप येते,
हाच मोठा ताप आहे, हा खरा संताप आहे...


दुःख दारोदार आहे,द्वेष जागोजाग आहे
फावल्या कांही क्षणांना ,आसवांचा शाप आहे...

.
सोडता सा-या अपेक्षा,दूर जाई की निराशा
जीवनाचे मर्म आहे,दीन सेवा माप आहे....

*** स्वप्नें आणि अश्रू

***

कां सुखाला पारखे आम्हीच आता ?
आपला दुःखास वाटे मीच आता....

पूर्ण आयुष्यातली माझी कमाई,
फक्त स्वप्नें आणि अश्रू हीच आता...

आसरा स्वप्नांस आहे लाभलेला ,
साठल्या त्या धुंद आठवणीच आता...

आसवांची गुंफली मी गीतमाला,
चाल त्यांची,दुःख सांगी तीच आता...

ऐकले नाही कुणीही शब्द माझे,
खंत माझ्या या मनाला हीच आता ...

मोकळे आहेत दोन्ही हात माझे,
संपदा माझी सुन्या नयनीच आता ...

*** पाहून घेऊ

***
काय जे होईल ते पाहून घेऊ
वर्तमानाची मजा चाखून घेऊ...

प्रश्न राही वेगळा प्रत्येक वेळी
जिद्द आहे,उत्तरे शोधून घेऊ....

लेख भाळी कोणता,कोणा कळेना

लोट ज्वाळांचे पडो ,साहून घेऊ....

सोसतो अंधार आम्ही रोज येथे,

आंधळे आयुष्य उजळून घेऊ....

आशयाचे शब्द आपोआप आले,
गुंफलेले गीत हे गाऊन घेऊ...

वेदनेने सार्थता जगण्यास येते,
व्यर्थतेची कारणे जाणून घेऊ...

सोबतीला राहती दुःखेच अंती,
नेहमी दुःखात सुख मानून घेऊ...

*** थेंब ज्यांनी गाळले...

***
एकदाचे दुःख आम्हा ,शेवटी कंटाळले
पाहुणा जाता नकोसा,दोन अश्रू ढाळले...

सोसतांना तोल जाता,हात स्नेहाने दिला
ते तुम्ही, ज्यांनी जिवाला नेमके सांभाळले ..

आपल्या प्रेमातली मी, खूप जादू पाहिली
कोण होतो,काय झालो? हे मनाशी चाळले...

माझिया श्वासात होती, आपली ती स्पंदने
फूल माझ्या आसवांचे मीच आता माळले...

जागता निर्धार माझा, ठाम आहे आज ही
जे दिले होते तुम्हाला,शब्द माझे पाळले...

सांत्वने केली मनाची,साथ मोलाची दिली
खूप आभारी तयांचा ,थेंब ज्यांनी गाळले...

*** बसशील जरा

***
क्षण एक तरी बसशील जरा
उमलून कळ्या फुलतील जरा....

सहवास तुझा मिळताच मला,
मम व्यर्थ व्यथा पळतील जरा...

नटली धरणी हिरवी हिरवी
पदन्यास हरी करशील जरा...

मन आतुरले,तव सूर हवे
निज वेणु मुखी धरशील जरा...

रमतो अगदी तुझिया भजनी
पतितास कधी दिसशील जरा...

शरणागत मी बसलो चरणी
अमुच्यासमही तरतील जरा..

*** गंध शिंपडून जा

वृत्त---...... पादाकुलक
मात्रा----...[८] [८]

***

गंध मजवरी शिंपडून जा
मला तव मनी साठवून जा....

माझ्या स्वप्नी तू येत रहा
मैफलीस त्या गाजवून जा ....

जवळी नसता भान हरपते
आताच मला सावरून जा ....

ठेवणीतल्या गोड क्षणांना
उसवून पहा, जागवून जा....

जीवन अपुले एक ग़ज़ल ही,
मतला मज तू ऐकवून जा....

उरी भावना करती गोंधळ
जरा पसारा आवरून जा....

डोळ्यांस कधी डोळा भिडे
जागवू नको,झोपवून जा....

पांघरूण तू घाल मजवरी
चांदण्या या पांघरून जा....

*** तुझियासाठी


*** कल्याण वृत्त

***
तुझियासाठी
***


नभी चांदणे चमकत राहो तुझियासाठी
रवीरश्मिही दारी येवो तुझियासाठी

वारा लावो मेघ पळवून नैराश्याचे
दहा दिशा या मोदच उधळो तुझियासाठी

कधी मोकळी गज-याविण नसोच वेणी
वेल फुलांनी फुलून येवो तुझियासाठी

सदा अंगणी प्राजक्ताचा सडा पडावा
सौख्याची सर बरसत राहो तुझियासाठी

शब्दसुधेचे नवसंजीवन लाभों तुजला
तुझ्याच कविता वारा गावो तुझियासाठी

अवखळ खळखळ निर्झर वाहो तुझियासाठी
कुहूकुहू ही कोकिळ गावो तुझियासाठी.....

*** वाटले होते

***
उंच आकाशी उडावे वाटले होते
प्राक्तनाने पंख माझे छाटले होते...

मीच होतो संचिताचे लाडके गाणे
हुंदके ओठांत माझ्या दाटले होते...

अंबरी दाटी ढगांची जाहली होती
थेंब माझ्या आसवांचे आटले होते...

नाव अमुची पोहचेना हो किना-याला
वादळाने शीड तेव्हा फाटले होते...

मी तरी कंगाल नाही जाहलो जेव्हा,
शाहण्यानी सर्व माझे लाटले होते...

*** दुखणे...


***
तव आठवणी,मधु हे दुखणे
हुरहूर मनी झुलते दुखणे...

नसलीस जरी अवतीभवती
असतेच मनी हसरे दुखणे...

नयनी तुझिया दिसतोय मला
लटका रुसवा फसवे दुखणे...

दिसणार कशा तुज या जखमा ?
निरखून पहा मधले दुखणे...

मदिरा न करी मदहोश मला
निराळाच नशा असते दुखणे...

इतिहास नवा घडवी नियती
दररोज असे नवखे दुखणे...


....

मीटर... ललगा ललगा ललगा ललगा 

*** याच देही...

***
वृक्षवेली याच देही
बाग़ माळी याच देही...

नाद अनहद ऐक जीवा,
नित्य होई याच देही...

सप्तसागर लक्ष तारे,
सर्वकाही याच देही...

रत्न मोती खाण येथे,
पारखीही याच देही...

स्वर्ग अन् पाताळ सारे,
जाण तेही याच देही...

जो जगाचा रे नियंता,
राम राही याच देही...

*** ऐसे कां घडावे ?

***
तू कुठे ना सापडावे,
मी हसावे की रडावे ?

ज्या दिशेने मी निघावे,
त्या ठिकाणी तू दडावे !

सत्य वागावे तरीही,
लागते कां ओरडावे ?

सारखे कोमेजलेले
फूल तुज कां आवडावे ?

मी तुझी की तूच माझा,
प्रश्न असले कां पडावे ?

तू अंतरी परि दिसेना,
सांग,ऐसे कां घडावे ?

*** धाव आता..

***
बेरकी या माणसांचा वाढला की भाव आता ,
मूल्य नाही चांगल्याला,कोण घेतो नाव आता ?

शाहण्यांचा काफिला तो,एकटा मी फक्त वेडा
सोबती येण्यासही,केला मला मज्जाव आता

धूर्त सा-या माणसांनी थाटली येथे दुकाने
भाबड्या भोळ्या जनांचा गाठ रे तू गाव आता

दक्षता मी पाळली अन् चोख होतो मी तरीही,
दुर्जनांशी खेळतांना हारलो मी डाव आता

ही लबाडाचीच दुनिया,सज्जनांचा कोण वाली ?
राहिले पा-यापरी ते चोर झाले साव आता

कष्ट करती कां तरीही भाकरीची भ्रांत आहे !
धूर्त जे जे रंक होते,जाहले ते राव आता

रे मना ! तू आपली शक्ती पणाला लाव आता
गांजलेल्या दुःखितांना हात द्याया धाव आता....

*** रे मना !


*
मार्ग वाकडे मना,जरा जपून जा
तोल जायचा उगाच,सावरून जा

खूप दुःख सोसले निमूट रोज तू
आज धुंद स्वप्नगीत आळवून जा

नेहमी असा वसंत सापडेल का !
एकदा तरी सवंग मोहरून जा

सैल होत चालले विरून वसन हे
प्रेमबंध सावकाश आवळून जा

रात्र मागते-'जरा प्रकाश दे मला'
चांदणे हळूच तूच पांघरून जा

गुंतवून ठेवले कुणी कुणास रे !
पाकळ्यांत मंद गंध साठवून जा 

*** मीच

भूतकाळातला धूर होते
मन्मनी आज काहूर होते...


जाळल्या भावना एकदाच्या ,
मीच पूजेत कापूर होते...

ठाव माझा मला सापडेना,
मी तुझ्या अंतरी चूर होते...

भाबडे शब्द हुरळून गेले,
भाव सारेच मंजूर होते...

वाहता तव झरा आटला कां ?
लोचनी मी तुझ्या पूर होते...

पाठ तू फिरवली आज तरिही ,
मीच कंठी तुझा सूर होते....

एक हाकेत होते तुझ्या मी,
कां तरी,योजने दूर होते !

*** फुलणे मनाचे...


***
वृत्त----- इन्द्रवज्रा
गण---- त-त-ज-ग-ग
यती---- ५ व्या अक्षरावर

***
नाकारले मी सुकणे मनाचे,
स्वीकारले हो फुलणे मनाचे...

कंटाळलो या तुटण्यास आता,
दुःखात झाले जुळणे मनाचे...

आघात मोठे जबरीच  होते,
गेलो तरुनी जगणे मनाचे...

होते सदा ते रडकेच गाणे,
मित्रांमुळे हे हसणे मनाचे...

प्रेमात न्हालो अपुल्या मनी मी,
झाले बरे हे रमणे मनाचे...

आनंद झाला अवसान गेले,
झोक्यात आता झुलणे मनाचे...

*** हाक येता सुखाची


*
हाक ही येता सुखाची ,कां धुके दाटून येते ?
टाकता थोडा उसासा,दुःख हे धावून येते...

आठवू आता कशाला,भूतकाळाचे खुलासे !
वर्तमानातील गोष्टी स्वप्न गुंडाळून येते .....

खेळ काळाचा बघा हा,पाहिजे तेव्हा मिळेना
चांदणे भासे दुपारी,रात्र अंधारून येते...

वाटुनी येता उदासी ,हुंदका दाटे गळ्याशी
लोचनी साठून तेव्हा, प्रेम ओथंबून येते...

पाहवेना दुःख परके,माझिया वेडया मनाला
सोबतीने ते दुजांच्या , आसवे ढाळून येते...

Saturday 28 May 2011

*** आत माझ्या...

*
मी उमाळे कोंडले ओठात माझ्या,
कैद झाले सूरही श्वासात माझ्या....

खेळला माझ्यासवे तो खेळ बाका,
डाव नाही राहिला हातात माझ्या...

ऐकता आकांत माझ्या काळजाचा,
हुंदका कोंदाटला कंठात माझ्या ...

झोंबला बेफाम वारा कुंतलांना,
शांत आता झोपला केसात माझ्या...

वेचण्या जेव्हां निघाले आसवांना ,
श्वेत मोती सांडले पायात माझ्या...

खूप पडल्या अंगवळणी सर्व गोष्टी,
तंग झाली जोडवी बोटांत माझ्या ...

शांतता ढळते कधी का सागराची !
वादळे होऊन गेली आत माझ्या...

*** कोठून येती आसवे !

***
सांग ना, कोठून येती आसवे !
पापण्यांना भार झाली आसवे

हास तू, कोणीतरी हे बोलता
मुक्त वाहू लागली ही आसवे

त्रास होता बंद डोळे उघडती ,
वाहुनी घावास नेती आसवे

शुष्क या डोळ्यांवरी जाऊ नका
वाहती त्यातून माझी आसवे

ओठ दमले गप्प झाले शेवटी
नेमकी कामास आली आसवे

ठेवता विश्वास हो कोणावरी ?
आपली नसतात काही आसवे

*** आसवे...

***
वृत्त---मेनका
गण-- गालगागा गालगागा गालगा


**
सोबतीला माझिया ही आसवे
वेदना येताच जाती आसवे...

मारता कोणी मिठी वा चापटी,
वाहती डोळ्यातुनी ही आसवे...

जीवनाला ह्रदय माझे सांगते,
'स्पंदनांची एकतारी आसवे'...

दुःख की आनंद,कांहीही असो
पापण्या ओलावती ही आसवे...

आवरावे हुंदके की भावना ?
थोपवू सांगा कशी मी आसवे....

कुंभ अश्रूंचा रिता होतो कुठे !
अंतरीची ठेव माझी आसवे...

*** खंत

***
साद जेव्हां घातली मी,थांबले नाही कुणी
टाळले सा-या दिशांनी,ऐकले नाही कुणी

जोडली नाती तरी नामानिराळा राहिलो

पान माझ्या पुस्तकाचे चाळले नाही कुणी

प्रश्न माझा एकटा दारी उपाशी थांबला

उत्तराची वाट होती,बोलले नाही कुणी

ओळखीचे लोकही दूरस्थ होऊ लागले

भेटती रस्तात सारे,आपले नाही कुणी

शब्द लोकांना दिलेले सर्व आम्ही पाळले

आपल्या शब्दांस येथे जागले नाही कुणी

आतला काळोख जेव्हां पापण्यांनी झाकला,

एकल्या दुःखास माझ्या स्पर्शले नाही कुणी

बाव-या वेडया मनाला ,खंत आता वाटते

सोबती खेळावयाला लाभले नाही कुणी

*** मासा गळाला लागला

***
सूर मी मौनात तुझिया ऐकला
नाद त्याचा अंतरी झंकारला

कुंतले झेपावली खांद्यावरी,
लाख मोलाचा दिलासा लाभला

पाहिले डोळ्यांत तुझिया चांदणे
चंद्र हा माझ्या समोरी लाजला

चालतांना वाकलो पाठीत मी ,
भार स्नेहाचा रतीभर वाढला

धुंद वारा कुंतलांशी खेळता ,
तीर जिव्हारी मला गे लागला

गुंतलो जाळ्यात तुझिया मी कसा ?
नेटका मासा गळाला लागला

*** मानतो आभार मी...

***
बाणला जिंकायचा निर्धार मी,
घेतली नाही कधी माघार मी...

संचिताची एक रेषा लोपली,
भग्न स्वप्नांचा वृथा शृंगार मी

आसवांची धार जेव्हां लागली,
मोतियांचा मांडला बाजार मी...

त्राण नव्हते राहिले पायांमधे,
नाचणारी बाहुली लाचार मी....

बोलक्या डोळ्यांत पाणी साचले,
मूक शब्दांनी दिला होकार मी...

दुःख वारेमाप वाट्याला दिले,
प्राक्तनाचे
मानतो आभार मी...

*** आतला सूर हा खरा माझा

***
आतला सूर हा खरा माझा ,
वाहता ठेवला झरा माझा ...

स्वैर मोकाट वासरू नाही,
मोह मायाच पिंजरा माझा...

पाहिला लोचनी तयेच्या मी,
हरवलेलाच चेहरा माझा ...

काय बोलू तिच्यासवे आता ?
शब्द ओठांत लाजरा माझा...

गूज खग सांगतात फांदीला,
गोड गाण्यात अंतरा माझा...

हाल पाहून हास आयुष्या,
चेहरा निखळ हासरा माझा ...

झगमगाटातली नको दुनिया,
शांत एकांत हा बरा माझा ....

*** आठवांचे थवे

***
आठवांचे वाहुनी आले थवे
डाव त्यांनी मांडला माझ्यासवे

आठवांची चाळली पाने जरा
लोचनी दाटून आली आसवे...

दाटला अंधार होता अंतरी,
घेतले हातात कांही काजवे

घाव जिव्हारी कितीदा लागले,
नेहमी आणू कसे औषध नवे ?

साठली ओठांत गोड़ी केवढी !
प्यायलो तेव्हा सुधा ती जाणवे...

वादळी थैमान मानस सागरी,
नाखवा होतील अमुची आठवे....

*** येशील कधी तू ?

***

वृत्त--- विधाता

मात्रा-- ( १४,१४ )


***

शब्दच निःशब्द झाले, सखया येशील कधी तू ?
सूर ही झिंगून पडले, सजणा येशील कधी तू ?
*
मयूर डौलदार नाचती, प्रियाराधन ते करती,
आग मनीची विझवाया, सजणा येशील कधी तू ?
*
पाहून दशा वसुधेची, गहिवरले आभाळ नभी,
पाझरले,भिजवली धरा,सखया येशील कधी तू ?
*
फांदीवरी पक्षी भिजले, फडफडून अंग झटकले,
तुजसाठी मन भिरभिरले,सखया येशील कधी तू ?
*
तव स्पर्शाला आसुसले,कुन्तलावरचे शुभ्र मोती,
वेल कवळाया धावते, सजणा येशील कधी तू ?
*
सूर लाडिक बासुरीचे,नि धून तुझी लयवेडी,
कान माझे टवकारती, सखया येशील कधी तू ?

*** सांगावया लाजू नका

***
आनंद येता अंतरा, माझ्यासवे बोलू नका
दुःखात असतांना मला,सांगावया लाजू नका

बाजूस सारा वल्गना,वेडेपणाच्या कल्पना
आयुष्य आहे साजरे, खोटी भिती घालू नका

होतेच कोठे आपले,काही मनाशी बोलणे ?
संवाद आता नेमका,सांधायचे टाळू नका

कोणी कधीही आपले, झालेच नाही शेवटी
नाही कुणीही सोयरा,व्यर्थ अश्रू ढाळू नका

आयुष्य माझे संथ ते,जोशात आता चालतो
कोषात राहू मी कसा?थांबायला लावू नका

गाण्यात भजनाची मजा,भक्तीत जगण्याची मजा
हा 'राम'आहे अंतरी, भेटावया विसरू नका....

*** गंधाळले गीत माझे....

***
नुसत्या तुझ्या चाहुलीने वेडावले गीत माझे ,
नादात तव कांकणांच्या झंकारले गीत माझे...

भासात गुंतून जाता ,थोडा कुठेसा असा मी,
चोरून हृदयात तुझिया डोकावले गीत माझे...

केसांतला कैद वारा मस्तीत धावून आला,
बरसात झाली सुरांची ,ओलावले गीत माझे...

ओठांवरी कामिनीच्या घोटाळले शब्द थोडे,
पाहून लावण्यखाणी,लाडावले गीत माझे...

येताच तू मैफलीला ,भारावले सूर ओठी
शृंगारले शब्द माझे, गंधाळले गीत माझे....


...... 

मीटर---
गागालगा गालगागा गागालगा गालगागा 

*** ओसाड माझे घर

***
ओसाड माझे घर मुळी नाही बघायासारखे
माझ्यात सांगा काय उरले आवडायासारखे !


बेहोष होत्या मैफली,झंकारल्या दाही दिशा
ते सूर नाही गवसले ,मज गुणगुणायासारखे

स्वप्नांसवे चर्चा कशाला वास्तवाची मी करू ?
पण शब्द माझे वाटले मजला कसायासारखे


शब्दाक्षरांच्या भोवताली नाचलो मौनात मी,
बेभान माझे वागणे होते हसायासारखे...

एकांत माझा एकला, देहात देही एकटा
कोणी न जवळी राहिले आता रुसायासारखे

*** अज्ञात प्रारब्धास ....

***

अज्ञात मुक्कामास मी माझा निवारा मानले,
अज्ञात प्रारब्धास या ,'त्याचा ' इशारा मानले...

मोजू कशाला वार जे,अंगावरी मी झेलले
मी जीवनाला माझिया,प्रेमळ उबारा मानले...

झिंगून जाता मी जरा,गर्वात डोलू लागलो
चपराक कानी बैसली,याला उतारा मानले...

नावेत पाणी माझिया,होते शिराया लागले
मी ज्या ठिकाणी थांबलो,त्याला किनारा मानले...

केसासही धक्का नसे,सांभाळले कोणी मला ?
आनंदलो, यालाच मी 'त्याचा' पहारा मानले ...

मागू कुणाला काय मी ! सारे विधात्याने दिले
हातून जे घडले कर्म ते,त्यासी चुकारा मानले.....

*** वार्‍यावर वणवण केली,

***
घर माझे शोधाया मी वार्‍यावर वणवण केली,
नसता अनमोल क्षणांची, संपत्ती तारण केली....

खळखळता निर्झर नव्हता, झुळझुळता वारा नव्हता
वैराण निराशेपाशी आशेने जुळवण केली .....

जखमा दिधल्या याच शिरी, कळ उठली माझ्या हृदयी
त्यांच्यासाठीच अता मी,सुमनांची पखरण केली....

जो जो दिसला तो अपुला, नाही केला भेद कधी
होती नव्हती ती पूंजी ,सारी मी अर्पण केली....

सुखस्वप्नांचा सरगम मी साठविला होता कंठी ,
सप्तसुरांनी कोणास्तव रागांची उधळण केली ?

*** प्रेम कुणावर जडणेही

***
याचेच रडू आले की, जमले मला रडणेही
आत धुमसले इतके की, थेंब विसरले झडणेही

कोंडून उमाळे सगळे, अधरातच होते जपले
जमलेच कुठे या माझ्या ओठांना ओरडणेही

पाहून मला त्या आल्या जोराच्या वादळलाटा
अंगाशी आले माझ्या ,मी अवचित सापडणेही

आवाज दिला मी जेव्हां,ऐकू कुणाला आला
दुर्मिळ झाले आज मला माझ्या हाती पडणेही

आकार कसा मी देऊ, गेलेल्या आयुष्याला ?
बिघडून असे गेले की, अवघड झाले घडणेही

प्रेमाचा मंजुळ
वारा,आल्हाद मनाला देतो
दुःखाचे कारण होते,प्रेम कुणावर जडणेही

*** धावणे नाही खरे

***

प्रारब्ध हाकारेल तिकडे धावणे नाही खरे
पंखातली शक्ती खगाने विसरणे नाही खरे....

साध्या सरळ वृक्षास आधी तोडले जाते इथे,
विश्वात भोळ्या भाबडयांचे वागणे नाही खरे...

ती साद मज घालून दमली कोकिळा फांदीवरी,
ऐकूनही निःशब्द माझे राहणे नाही खरे ....

बोलावणे येता सुखाचे खूप मी हुरळून गेलो,
हुलकावणी देऊन त्याचे निसटणे नाही खरे...

वाटेवरी हे पांगळे आयुष्य थोडे थांबले ,
पाऊल आधाराविना मी टाकणे नाही खरे...

माझ्याकडे पाहून छद्मी हासली माझी व्यथा ,
दारी सुखाच्या हे तिचे ओसंडणे नाही
खरे......

*** सावल्यांचा हा पसारा ....

***
मोर हा माझ्या उशीवरचा फुलवितो कां पिसारा ?
लागता कुणकुण तुझी,अंगावरी आला शहारा ....

झोपलो की जागलो मी, चंद्र साक्षीदार आहे
पाहिजे तर अंथरूणाच्या सुरकुत्यांना विचारा...

पाहिले नाहीस तू
अन् बोलली नाहीस मजशी
एकला गर्दीमधे हरवून गेला हा बिचारा...

दुःख छळते सारखे तुझिया दुराव्याचे मला गे,
वाटते फेकून द्यावा,सावल्यांचा हा पसारा ....

जिद्द होती ना तुझी की ,तोंड ही पाहणार नाही !
कां गवाक्षातून पदराने तुझ्या केला इशारा ?

*** दिलासा लाख मोलाचा

***
तशी ना आसवे की हुंदका हा दाटतो आता,
तरी माझ्याच दुःखांना हवासा वाटतो आता...

असो आनंददायी की,असू दे याद दुःखाची
जराशा आठवांनीही,गळा हा दाटतो आता....

तुझा पाऊस प्रेमाचा,अता माझ्यावरी नाही
कधी ओलावल्याची मी,सजा ही काटतो आता....

तुझ्यासाठीच प्रीतीचा ,पुरेसा अंतरी साठा
तुझ्यासाठी सदा वाहे,झरा ना आटतो आता...

तुझ्या एकाच शब्दाचा,दिलासा लाख मोलाचा
सुखाची भव्य साम्राज्ये ,पहा मी थाटतो आता...

*** व्यथांचा लाडका

****

कधीपासून सर्वांच्या व्यथांचा लाडका झालो
सुखांनी सोडल्याने मी,सुखांना पारखा झालो...

नदीला पूर आलेला,मजेने नाहती सारे
मनी नाहीच ओलावा,बघा मी कोरडा झालो...

उभा अंधाररात्री मी, तटस्थासारखा आहे
जनांना वाट दावाया, जगासाठी दिवा झालो...

मला गोंजारती दुःखे , हवासा वाटतो त्यांना
पळाले दूर सांगाती, असा मी पोरका झालो ...

हवे ते लावले जेव्हा जगाने अर्थ शब्दांचे ,
तसा वाचाळ होतो मी, जरा आता मुका झालो...

पुढे झेपावले सारे, कुणाला काय हो माझे ?
दिली मग साथ दु:खांनीच, दु:खांचा सखा झालो...

*** मनास ....

***

मनास मी बजावले,जपून टाक पावले
मलाच झोपवून ते,पुढे सुसाट धावले...

वनावनात पाहिले,दिशादिशांत शोधले
जरा न पापणी हले,क्षणात आत गावले...

बनेल बेरकी बघा, फुलाफुलात हिंडले
मलाच गोड़ बोलुनी मधाळ बोट लावले...

कधी चुकून वाटते,उगाच त्यास बो़ललो
मनास मोहरू दिले,इथे तयास फावले...

हवास तूच रे मना, मला तुझीच कामना
अजून सर्व रंग तू ,मला जरी न दावले...


......

वृत्त --कलिन्दनंदिनी

लगालगा लगालगा लगालगा लगालगा 

*** कन्येसाठी ...

***
तुझेच शब्द नेहमी मनात साठवायचे
विचार सारखा तुझा करीत
मी झुरायचे....

तुझ्यासवेच गायची लयीत गान कोकिळा,
मुकी फुले नि पाकळ्या तुलाच दाद द्यायचे...

तुझ्याविना सुने इथे,तळ्यामळ्यात शांतता..
तुझीच वाट पाहुनी कसेतरी जगायचे....

मधाळ बोलघेवडी फुलाफुलांस बोलली
मुकेच शब्द जाहले,मनात थोपवायचे...

असाच वृक्ष अंगणी पडेल उन्मळून हा
तया नकोच वाटते तुझ्याविना तगायचे..

*** पळू नये सुखाकडे...

***
सदैव लक्ष आपले नसो जरी जगाकडे
जगात लोक पाहती खिळून आपल्याकडे...

चुका कधीच आपल्या स्वये न लोक जाणती
लगेच बोट दाविती हसून आमच्याकडे...

कधी कुणासमोर मी न वाचली व्यथाकथा
पुढे पुढेच चाललो खळाळत्या झ-याकडे ...

विचार आपल्या मनी नको उदास यायला
पहात राहतो सदा म्हणून मी नभाकडे...

उमेद हाच जीवनी सदैव एक आसरा
सदा मनी फुलायचे बघोनिया फुलाकडे...

न पाठ दुःख सोडते कधीच जीवनात या
उगाच दुःख टाळण्या, पळू नये सुखाकडे...

*** मनातल्या मनात मी...

***
मनी करीत राहतो विहार अंबरात मी
परीसवेच खेळतो मनातल्या मनात मी...

लवून सावकाश ती पुढयात हात सारते
करे करी सुखावतो हळूच अंतरात मी...

असा कुणासमोर मी कधी न स्वैर नाचलो
हवेत धुंद नाचतो परीसवे नभात मी....

परस्परांस भेटतो उराउरी ढगावरी
पहात राहतो मला तिच्याच लोचनांत मी...

उधाण येत राहते मधेच सागरास या
कवेत माझिया परी,सळाळतो क्षणात मी...

मनातल्या मनात मी,परीस हाक मारतो
तिचाच घेत राहतो सुगंध आठवात मी...

*** खुशीत गायचे मला...

***
नको मिळो कुणाकडून, फक्त द्यायचे मला
उरी सदैव आपल्याच,स्थान घ्यायचे मला....

असेच प्रेम आपले, अमाप रोज पाझरो
तयात नित्य न्हायचे नि चिंब व्हायचे मला...

उदास वाटता मना,तुलाच आठवायचे
तुझाच गंध घेउनी पुन्हा रमायचे मला...

रसाळ शब्द वाचुनी, मनोमनी सुखायचे
सुरेल गीत आपले,खुशीत गायचे मला...


नसेल सोबती कुणी, असेल 'राम' संगती
कधी पिता कधी सखा असे भजायचे मला...

*** तुझ्यासवे फिरेन मी...

***
तुझ्या मनी क्षणोक्षणी असेन वा नसेन मी
तरी तुझ्या पथावरी सुवास अंथरेन मी

असा रुसू नकोस तू, लकेर छेड साजणा
असेन पंचमात मी,सुरात सापडेन मी

कणाकणात मोकळा,करून हासरा झरा
सदैव ठेव वाहता,तुझ्यासवे हसेन मी

तुझाच ध्यास लागतो,तुझ्याशिवाय कोण मी ?
तुला समोर पाहुनी ,तुझ्या मनी लपेन मी

सुकून चालली फुले,मलूल जाहली किती !
पियूष दे तया जरा,तुझ्यात पाझरेन मी

तुझ्याविना जगायचे अशक्यप्राय हे सख्या,
परीघ वर्तुळावरी ,तुझ्यासवे फिरेन मी....

*** जगून वर्तमान

***
अजून हे असे कसे किती निराश व्हायचे ?
कळ्यांकडे बघोनिया फुलांसवे हसायचे...

नकोच सूडभावना ,मनात स्नेह पाझरो
असो कुणी अनोळखी तयास हात द्यायचे...

स्वभाव आपला असा,झुरावयास लावतो
करून कर्म चांगले मिळेल तेच घ्यायचे....

वसुंधरेकडून तू शिकून घे मना जरा
तसेच सोससोसता हसून देत जायचे...

तमा नकोस बाळगू फुटेल पालवी नवी
जगून वर्तमान हा,मजेत गीत गायचे...

*** जरा सुखाने

***
जरा सुखाने निवांत थोड़ा जगून गेलो
फुले कळ्या या मलूल होता गळून गेलो

पहाटवारा तुझ्याचसंगे निघून गेला
इथे तजेला मला मिळेना,सुकून गेलो

तुझ्याच वाटेवरी उभा मी, अजून येथे
उरात आहे जरी दिलासा,दमून गेलो

तुझा उमाळा,तुझा दुरावा छळून जातो
हिशोब नाही किती कितीदा रडून गेलो

पहात होतो तुझीच स्वप्नें सये गुलाबी
खुणावले तू मला असे की, उठून गेलो

कुठून आला सुखावयाला पहाटवारा ?
तुला समोरी बघून मी तर,उडून गेलो....

*** हसून घेऊ

***
ललाटरेषा असो कशाही,हसून घेऊ
कधी दुरावा असह्य होता रडून घेऊ...

क्षणाक्षणाला असे कितीदा मरायचे हो ?
खुशालचेंडू मनाप्रमाणे जगून घेऊ...

पराभवाच्या फुका भितीने खचायचे कां ?
नव्या दमाने छुप्या रिपूंशी लढून घेऊ ...

नसो सुखाचा निवांतवारा सभोवताली ,
तरी व्यथांना सखा जिवाचा म्हणून घेऊ....

भल्याभल्यांना सुकून जाणे कधी न चुकले
कळ्याफुलांना फुलावयाला झटून घेऊ....

नसे पुरेशी हयात संबंध जोडवाया ,
तुटून जाते क्षणात नाते जुळून घेऊ....

*** रात रमून गेली

*
तुझ्याच स्वप्नात रात माझी रमून गेली ,
नव्या दिशेने पहाट ताजी खुलून गेली....

हव्यास खेळायचा फुलांशी मलाच नडला
अखेर सलवार कंटकांनी भरून गेली...

कुणीतरी आपले असावे जगावयाला
तुझ्याविना वाटिकाच माझी सुकून गेली ...

तुझी प्रतीक्षा करीत होती सताड दारे ,
नशीब ज्यांचे समीपता तव मिळून गेली ...

थकून डोळे मलूल झाले,लगेच ये तू
हळूहळू आसवे किती रे गळून गेली !

*** माझा लिलाव झाला

***
मला कळता कधीच माझा लिलाव झाला
मनास रोखून ठेवण्याचा स्वभाव झाला ...

उचलत गेलो असंख्य ओझी कुणाकुणाची
असून घायाळ,चालण्याचा सराव झाला ...

सुखा,खुशाली नकोस सांगू कुणास खोटी
-या परीक्षेत आज माझा निभाव झाला...

अनोळखी वाटतो जरी मी जगास आता,
तरी करावे जनाकरीता,ठराव झाला...

असत्य जुजबी,खरे टिकाऊ ,कळून आले
मनावरी चांगलाच माझ्या प्रभाव झाला...

*** कुणीच नाही...

***

कुणीच नाही जगात मी या,कुणीच नाही
परंतु येथे असाच दुसरा कुणीच नाही ....

मुळीच नाही मला उमगली कधी लबाडी
घडा रिता तर ,पुसावयाला कुणीच नाही...

चकाकणारे असंख्य तारे कुठे पळाले ?
भयाण रात्री इथे हवासा कुणीच नाही...

कुणाकुणास्तव अनेक वेळा झटून झाले !
उधाण वा-यात सोबतीला कुणीच नाही...

पदोपदी भेटती शहाणे सभोवताली,
जगात माझ्या समान वेडा कुणीच नाही...

Friday 27 May 2011

*** तुझ्या मिठीने दिली उभारी

***
विवंचनेच्या कुशीत खोटे हसून गेलो
तुला समोरी बघून मी भरभरून गेलो

मलाच मी वाटलो ति-हाइत क्षणाक्षणाला
तुझ्याच स्वप्नात एवढा मी रमून गेलो

तुझा सुगावा कसा लागला मनास माझ्या !
अदृश्य झोक्यावरी खुशीने झुलून गेलो

तुझ्याच डोळ्यांत पाहिली मी असंख्य स्वप्नें
तुझ्यासवे सागरातही मी तरून गेलो

तुझ्याच हातावरी पहा मम ललाटरेषा
तुटून जाता पुन्हा पुन्हा मी जुळून गेलो

अखेर संजीवनी मिळाली जिवास माझ्या
तुझ्या मिठीने दिली उभारी,जगून गेलो

*** कुणी ना हसावे


***

कुणी ना हसावे, कुणी ना रुसावे
इथे एकटी मी, कुणीही नसावे....
*
नको धुंद वारा, नको गारवा हा
सख्या तूच माझ्या मनी पाझरावे ...


तुझ्या बासुरीने हवा धुंद झाली,
तयेच्या सुरांनी,मन मोहरावे....
*
नका ओढ़ लावू, नको ध्यास आता,
सदा अंतरी ,तूच माझ्या रहावे....
*
कधी मी रुसावे, तरी तू हसावे
पुरे खेळ आता, मला सावरावे...
*
कुणी का असेना, कुणी का नसेना
मला काय त्याचे ? मनी तू वसावे....

*** तुझी याद आली...

***
...भुजंगप्रयात वृत्त ....
***


पहाटे पहाटे ,तुझी याद आली...
तुझ्या चाहुलीने ,मला जाग आली....

निशा काजळाची, दिसे पापणीत ...
कळेना कशी मज,पुन्हा झोप आली...

उषा आळसावे ,तुझी भेट होता...
निशेला वदे ती , जरा झोप आली...

तुझा स्पर्श होता, निद्रा दूर गेली
पहाटे पहाटे ,नशा आज आली...

कळेना मला ही ,कशी रात गेली...
तुझ्या आठवांनी , मना ओल आली...

नको जाऊ अशी ,मला झोपवूनी
तुझ्या सोबतीची ,मला झिंग आली...

*** तुला काय त्याचे !

***
झळा झेलल्या मी ,तुला काय त्याचे !
नदी आटली ही,तुला काय त्याचे !

सुखाच्या सुगंधी सदा नाहशी तू,
कळा जीव सोशी ,तुला काय त्याचे !

तुझ्या भोवताली फिरे धुंद वारा,
इथे वात नाही,तुला काय त्याचे !

उरीं हात जाती मनाच्या दिलासा,
उरे शूल पोटी,तुला काय त्याचे !

झुरे शब्द ओठी तुला ऐकवाया,
तुझा माग काढी,तुला काय त्याचे !

पहा धुंद स्वप्नें, मनाजोगती तू
मला झोप नाही,तुला काय त्याचे !

*** भले शब्द होते

***

भले शब्द होते,बुरे शब्द होते
जसा अर्थ घ्यावा,तसे शब्द होते...
*
किती गोड वाणी,किती सार्थ भाषा !
कितीदा स्मरावे,असे शब्द होते....
*
तुझ्या बासुरीचा जुना साज होता,
नवे सूर होते,नवे शब्द होते.....
*
तुझे धुंद डोळे,किती बोलके हे !
तरी लाजलेले ,मुके शब्द होते ?
*
मना रे !असा तू नको आळसावू
तुला भावलेले ,खरे शब्द होते...
*
निशेच्या गळ्याला,फुले तारकांची
नि ओठात माझ्या,खुळे शब्द होते....

*** लळा लागला रे

***
झरा आटलेला पुन्हा लागला रे
मला जीवनाचा छडा लागला रे

मनासारखा तू इथे सोबतीला
सुखे हार माझ्या गळा लागला रे

कळा जीवनाच्या किती सोसल्या मी !
सुगावा सुखाचा अता लागला रे

तुझा स्पर्श होता खुले चांदणे रे
खरा शोध आता मला लागला रे

पहा लुप्त झाली निराशा अताशा
असा जीवनाचा लळा लागला रे

*** असा मी...

***
नकोसाच वाटे खुळा हा जसा मी ,
तरी शाहण्यांच्या सभोती कसा मी ?

दुकाने नवी ही इथे थाटलेली ,
खिसा फाटलेला असामी असा मी...

किती सिंह येथे, किती लांडगे ही?
जगावे कसे हो,बिचारा ससा मी !

दिसेना कुठेही मला पान कोरे,
कसा सांग कोठे,उमटवू ठसा मी ?

किती जन्म घ्यावे तरी 'तो' दिसेना !
अशा आंधळ्यांना पहातो 'तसा'मी ...

*** अबोला तुझा

***
मला सोसवेना दुरावा तुझा रे !
झरा आटलेला पुन्हा लागला रे...

फुलांना कळ्यांना तुझा ध्यास होता,
डुलू लागली ती तुला पाहता रे ...

दिलासा मिळाला सुन्या मैफलीला
तुझा सूर कानी घुमू लागता रे ...

नवे शब्द फुटले उमेदीस माझ्या
नभी उंच जावे उभारी मना रे ....

तुझे गीत गाते इथे कोकिळा रे
तुला ती खुणावे सवे सूर गा रे ...

किती बोलका तू,मुका जाहला कां?
अबोला तुझा साहवेना मला रे...

*** स्वप्न माझे

***
तुला स्वप्न माझे पडू लागले
अहो, प्रेम आता जडू लागले

शिताफी मने चोरण्याची बघा,
लुटारू मला आवडू लागले

जरा वाटले भेट व्हावी तुझी ,
कसे दैव माझे दडू लागले !

फुलोरा वसंतास आला तरी,
फुले पर्ण कां हे झडू लागले ?

विचारू नये,हात दावू नये
ग्रहांचे इशारे नडू लागले

करावी तुझी काय वाखाणणी !
बहाणे नवे सापडू लागले

तुझे पाय माझ्या घरा लागता,
सगेसोयरे ओरडू लागले

तुला हासतांना जरी पाहिले,
सुखाचेच डोळे रडू लागले.....

*** नाही कुणी कुणाचे...

***

स्वार्थात गुंग सारे, नाही कुणी कुणाचे.
मोठेपणा भुकेले , नाही कुणी कुणाचे....

मी मी करीत गेले , 'मी' हा फितूर झाला.
तो एकटाच आहे , नाही कुणी कुणाचे....

नाहीस तू तुझाही , ना देह हा तुझा रे.
देही सदा विराजे , नाही कुणी कुणाचे....

माझी मला सलामी , आम्हास हे जमावे.
आनंद अंतराते , नाही कुणी कुणाचे....

सोडून दे वृथा ही , आशाच तू मना रे !
'आनंदकंद ' आहे , नाही कुणी कुणाचे...


आत्मा सदैव राही , कंठात 'राम' आहे.
सारेच रे क्षणाचे , नाही कुणी कुणाचे....

*** चाहूल संकटांची

***
चाहूल संकटांची , मी बावरून गेलो
सांभाळले मला तू, मी सावरून गेलो...

होता तुझा इशारा मी आपसूक आलो
हातात हात येता , मी बावरून गेलो...

ऐकून हाक कानी, आनंदले डोळे
डोळ्यात आसवांना , मी आवरून गेलो...

सामावलीस माझ्या गीतात अंतरीच्या
गाण्यात सूर आले, मी आवरून गेलो ...

आभास वेदनांचा नाहीच होत आता
दुःखात हास्य आले, मी सावरून गेलो...

*** कशाला ?

***

प्रत्येक पावसाला मी आठवू कशाला ?
मोहोरल्या क्षणांना,मी विस्मरू कशाला ...
*
आहेस लाडकी तू,संजीवनी फुलांची
हे उमलणे कळ्यांचे ,मी थांबवू कशाला?
*
केसांत झोपले मन, गंधात धुंद झाले,
बेभान या मनाला मी जागवू कशाला?
*
बोलून खूप जाती काळे टपोर डोळे,
संवाद रंगलेला ,मी थांबवू कशाला?
*
एकेक शब्द भासे ,गीतात माळलेला,
गंधाळल्या सुरांचा साज दवडू कशाला?

*** सोबतीला..

***
हाका दिल्या तरी ना, आलीस सोबतीला..
स्वप्नात मात्र माझ्या ,होतीस सोबतीला ...


मी एकटाच गातो गाणे खुळ्या मनाचे ,
ऐकावयास ना तू,होतीस सोबतीला ..

माझ्या मनात झाला, पाऊस आठवांचा,
ओलावण्यास तेव्हां,होतीस सोबतीला ...

कां दूर दूर जाशी ,ऐकून ऐकशी ना,
पाहून अंत माझा, आलीस सोबतीला ...

जाशील तू कधीही, होती मनात चिंता ...
ना गुंतलो जरी तू , होतीस सोबतीला...

*** हासू नका कुणी

***
पाहून हाल माझे, हासू नका कुणी
दुःखात हात द्याया,लाजू नका कुणी...

पोटास दुःखितांच्या देईन घास मी ,
आहे उभा भुकेला,लोटू नका कुणी...

बोलून साहवाव्या ज्या यातना मनी,
त्यांना अबोल कांही ठेवू नका कुणी...

कोणी कुबेर नाही, की संपदा तशी
गर्वात व्यर्थ तारे तोडू नका कुणी...

कोठे तुका नि नामा,कोठे कबीरजी ?
आपापलाच टेंभा ,मिरवू नका कुणी ...

सेवेत राम राही,सेवाच साधना
हातात तीच आहे, सोडू नका कुणी...

*** हारून जिंकण्याचा

****
हारून जिंकण्याचा माझा विचार आहे
माझ्यावरीच माझी सारी मदार आहे...


झाला सराव आता उद्ध्वस्त जीवनाचा
जिंकायची तरीही,इच्छा अपार आहे

कामास काय जुंपू,चंचल मनास माझ्या
वस्तीत कामनांच्या तेही फरार आहे...

हृदयातली व्यथा मी सांगू कशी कुणाला ?
माझ्याच भावनांची झाली शिकार आहे...

अद्यापही जराशी आहे उमेद बाकी
आयुष्य सावराया म्हणते तयार आहे...

आता कुणाकुणाच्या दुःखात सावरू मी ?
मी माझिया सुखाशी केला करार आहे...

ताजा पहाटवारा, आशा झपाटलेली
झंकार वेदनांचा झाला पसार आहे...

*** कबूल नाही...

***
सुकणे कबूल माझे,फुलणे कबूल नाही
त्यांना खुशीत माझे,असणे कबूल नाही...

माझे कसेबसे ते जगणे जगून झाले,
अद्यापही मला हे,मरणे कबूल नाही...

दुःखातल्या झळांना हासून साहले मी,
आता मला कधीही ,कुढणे कबूल नाही...

जाळून या जिवाला,अंधार दूर केला
अर्ध्यात दीपकाचे विझणे कबूल नाही...

उद्ध्वस्त जीवनाला जोडून ठेवले मी,
आता अशातशाने तुटणे कबूल नाही...

माथा नको तिथे मी,टेकून विद्ध झालो
रामाविना कुठेही झुकणे कबूल नाही....

*** शोधतो मी

***
प्रेमात गुंफलेल्या शब्दांस शोधतो मी
लाडावल्या सुरांच्या गीतास शोधतो मी

खोटेच रंग येथे कृष्णा खरे काही
राधेस लावला त्या रंगास शोधतो मी

मी बाग़ लावलेली सारी सुकून गेली
कोमेजल्या फुलांच्या गंधास शोधतो मी

धुंडून सर्व झाले,कोठेच तो दिसेना
कोलाहलात आता देवास शोधतो मी

वाटे उडून जावे आता तुझ्याच देशा
गाठावयास उंची पंखांस शोधतो मी

गर्दीत माणसांच्या मी एकटाच आहे
ठोक्यांत काळजाच्या रामास शोधतो मी

डोळ्यांसमोर माझ्या फिरतात अंक सारे
शून्यात हरवलेल्या शून्यास शोधतो मी...