Friday, 27 May 2011

*** अजून बाकी

***
वा-यात कुंतलांचे उडणे अजून बाकी
गंधात मोग-याच्या भिजणे अजून बाकी

वाटेवरी तुझ्या या बहरून बाग़ आली.
नाते तुझे फुलांशी जडणे अजून बाकी

आभाळ अंबरी या दाटून खूप आले,
बेधूंद पावसाचे झडणे अजून बाकी

आम्हा किती कितीदा हुलकावले सुखांनी !
याचा हिशेब चुकता करणे अजून बाकी

घेऊन चांदण्यांना दारात चंद्र यावा ,
काळोख अंतरीचा ढळणे अजून बाकी

चाहूल पैंजणांची मज लागली कुठेशी ,
एकांत जीवनाचा पळणे अजून बाकी

हातात हात यावा ,आनंद पाझरावा
हातात आसवांच्या पडणे अजून बाकी.....

No comments:

Post a Comment